औरंगाबाद – दुष्काळ पाहाणीसाठी आलेले केंद्रीय पथक पोलिसांच्या कडक सुरक्षेत शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता आणि शेतकऱ्यांत असलेली संतापाची भावना यामुळे केंद्रीय पथक पोलिसांच्या गराड्यात शेताची पाहाणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. शहर आणि ग्रामीण पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या कडक पाहाऱ्यात शेतकरी मनमोकळेपणाने आपले दुःख केंद्रीय पथकासमोर मांडू शकतील का हे आता पाहायचे आहे.
प्रशासनाला कशाची भीती?
दोन वर्षापूर्वी केंद्रीय पथकाला
शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. हा अनुभव लक्षात घेऊन केंद्रीय
पथकाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शहरासह ग्रामीण पोलिसांना विशेष सूचना
देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे केंद्रीय पथकाच्या सभोवती पोलिसांचे कडे राहणार
आहे. विभागीय आयुक्तालयात बैठक सुरू असताना सभागृहाच्या बाहेर मोठा फौजफाटा तैनात
करण्यात आला होता. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांसह इतर सुरक्षा यंत्रणाही सज्ज
होत्या. दुष्काळ पाहणी पथक गंगापूर तालुक्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याने त्या
मार्गावरही पोलिसांनी सुरक्षा कडेकोट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयुक्त-जिल्हाधिकाऱ्यांनी
दिले दुष्काळाचे प्रेझेंटेशन
औरंगाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शहरात दाखल झाले असून सकाळी साडेनऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिव छावी झा, कडधान्य विकास संचालक ए. के. तिवारी, केंद्रीय कृषी विभागाच्याचे संचालक आर. डी. देशपांडे यांच्यासह पथकातील दहा जणांची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची या पथकासमोर सादरीकरण केले. जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पथकातील सदस्यांनी खरीप पिकांची स्थिती, पावसाळ्यात पडलेला पावसाचा खंड, पर्जन्यमानाची टक्केवारी यासह उत्पन्नाचा अहवाल मागून घेतला. कृषी सचिव छावी झा यांनी दुष्काळ परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद करीत सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे आश्वासन दिले.










